Ad will apear here
Next
साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे
संमेलनाध्यक्ष होणाऱ्या पाचव्या महिला साहित्यिक
डॉ. अरुणा ढेरेपुणे : आशयगर्भ, भावपूर्ण कविता, ललित लेखन, कथा, समीक्षा अशा विविधांगी लेखनाने मराठी साहित्यविश्व समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांची ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तब्बल १७ वर्षांनंतर संमेलनाध्यक्षपद महिलेला लाभले असून, हे पद भूषविणाऱ्या त्या पाचव्या महिला साहित्यिक आहेत. यवतमाळ येथे ११ ते १३ जानेवारी २०१९ या कालावधीत हे संमेलन होणार आहे. 

संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता ज्येष्ठ साहित्यिकाची निवड करावी, अशी घटनादुरुस्ती साहित्य महामंडळाने अलीकडेच केली आहे. तिची अंमलबजावणी या निवडीपासून करण्यात आली. यवतमाळमध्ये झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर, डॉ. अरुणा ढेरे आणि प्रेमानंद गज्वी या तीन नावांवर चर्चा झाली. अखेर बहुमताने डॉ. अरुणा ढेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी रविवारी, २८ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारनंतर ही निवड जाहीर केली. 

तत्पूर्वी, डॉ. अरुणा ढेरे यांच्याशी संपर्क साधून त्यांचे नाव संमेलनाध्यक्ष पदासाठी निश्चित झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी हे पद स्वीकारण्यासाठी संकोच वाटत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा संपर्क साधल्यानंतर त्यांनी हे पद स्वीकारण्यास होकार दिल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. 

या आधी ज्येष्ठ लेखिका विजया राजाध्यक्ष यांनी २००१मध्ये इंदूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्याआधी १९६१मध्ये कुसुमावती देशपांडे, १९७५मध्ये दुर्गा भागवत, १९९६मध्ये शांता शेळके यांनी हे पद भूषविले होते. 

लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या अरुणा ढेरे या संवेदनशील कवयित्री, लेखिका म्हणून परिचित आहेतच. त्याचबरोबर संशोधनात्मक लेखनाचा वारसाही त्यांनी समर्थपणे जोपासला आहे. अज्ञात झऱ्यावर, कृष्णकिनारा, काळोख आणि पाणी यांसारखे कथासंग्रह, तसेच, निरंजन, प्रारंभ, मंत्राक्षर, यक्षरात्र असे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध असून, दुर्गा भागवत : व्यक्ती, विचार आणि कार्य, स्त्री लिखित मराठी कविता, आदी ग्रंथांचे संपादन त्यांनी केले आहे. ‘विस्मृतिचित्रे’ हा त्यांचा ग्रंथ विशेष गाजला. याशिवाय विपुल वैचारिक लेखन त्यांनी केले असून, त्यांनी मराठी साहित्यविश्वात दिलेल्या मौल्यवान योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. मराठी साहित्यात पीएच.डी. केलेल्या डॉ. अरुणा ढेरे यांनी पुणे विद्यापीठात १९८३ ते ८८ या काळात प्राध्यापिका म्हणून काम केले आहे.  

संवेदनशील आणि मृदू स्वभावाच्या डॉ. अरुणा ढेरे यांच्यासारख्या व्यासंगी, बहुआयामी व्यक्तीची या पदावर निवड झाल्याने साहित्यक्षेत्रासह अन्य क्षेत्रातूनही आनंद व्यक्त होत आहे. 

(डॉ. अरुणा ढेरे यांची पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZJPBT
Similar Posts
डॉ. अरुणा ढेरे यांचा ‘मसाप’तर्फे सत्कार पुणे : यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सन्मानाने निवड झाल्याबद्दल डॉ. अरुणा ढेरे यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे (मसाप) कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सत्कार केला.
‘मसाप’चा रेखा ढोले पुरस्कार जाहीर पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) पुणे आणि राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राजहंस’च्या एक अभिन्न सदस्य आणि राजहंस प्रकाशनाच्या पुस्तक निर्मितीच्या कार्याचा अविभाज्य घटक असलेल्या श्रीमती रेखा ढोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मसाप’तर्फे साहित्यक्षेत्रासाठी पुरस्कार दिले जातात. या वर्षी मराठी
पूरग्रस्त सांगली जिल्हा नगर वाचनालय पुस्तकांनी पुन्हा फुलणार! पुणे : अतिवृष्टीमुळे सांगलीत आलेल्या महापुरामुळे अतोनात नुकसान झाले. त्यात अनेक वर्षांची परंपरा असलेली आणि वाचनसंस्कृती समृद्ध करणारी ग्रंथालयेही जलमय झाली आणि हजारो पुस्तकांचा लगदा झाला. या ग्रंथालयांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुस्तकप्रेमींनी ग्रंथरूपाने मदत करावी, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेने (मसाप) केले होते
‘मसाप’त घुमला वामन मल्हार जोशींचा आवाज पुणे : तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र या विषयाचे नामवंत प्राध्यापक... महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सहकारी... विश्ववृत्त मासिकाचे संपादक... रागिणी, आश्रमहरिणी, सुशीलेचा देव, इंदू काळे आणि सरला भोळे या गाजलेल्या कादंबऱ्यांचे लेखक... मराठी साहित्य परिषदेचे माजी कार्याध्यक्ष... १९३० साली मडगाव (गोवा) येथे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language